Popular Posts

बंगालमध्ये BJPची ऐतिहासिक सत्ता, तामिळनाडूत विजयचा धडाकेबाज प्रवेश, केरळमध्ये काँग्रेसची पुनरागमन

बंगालमध्ये BJPची ऐतिहासिक सत्ता, तामिळनाडूत विजयचा धडाकेबाज प्रवेश, केरळमध्ये काँग्रेसची पुनरागमन

नवी दिल्ली | ४ मे २०२६: देशभरात झालेल्या विधानसभा निवडणुकांच्या निकालांनी मोठा राजकीय बदल घडवून आणला असून मतदारांनी स्पष्टपणे “बदलाची लाट” दर्शवली आहे. पश्चिम बंगालमध्ये भारतीय जनता पक्षाने (BJP) तृणमूल काँग्रेसचा पराभव करून १५ वर्षांची सत्ता संपवली, तर तामिळनाडूमध्ये अभिनेता-नेते विजय यांच्या तमिळगा वेत्री कळघम (TVK) पक्षाने पहिल्याच निवडणुकीत धडाकेबाज कामगिरी केली. याचवेळी केरळमध्ये काँग्रेस-नेतृत्वाखालील UDF पुन्हा सत्तेत आली आहे.

नवी दिल्लीतील BJP मुख्यालयात जल्लोषाचे वातावरण पाहायला मिळाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या विजयाला “ऐतिहासिक” संबोधत सांगितले की, “बंगालमध्ये आता भीतीमुक्त आणि नव्या भविष्याची सुरुवात झाली आहे.” त्यांनी कार्यकर्त्यांना सूड नव्हे तर बदलाच्या राजकारणावर भर देण्याचे आवाहन केले.

पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वाखालील तृणमूल काँग्रेसची १५ वर्षांची सत्ता संपुष्टात आली. उत्तर बंगालमधील मजबूत पकड कायम ठेवत BJPने दक्षिण बंगालमधील कोलकाता आणि आसपासच्या भागांमध्येही मोठी आघाडी घेतली. इतकेच नव्हे तर ममता सरकारमधील २० हून अधिक मंत्री आपल्या मतदारसंघात पिछाडीवर असल्याचे चित्र दिसले.

तामिळनाडूमध्ये विजय यांच्या TVK पक्षाने राजकारणात ऐतिहासिक प्रवेश करत DMK आणि AIADMK या पारंपरिक पक्षांना मोठा धक्का दिला. १९६७ पासून राज्यात सत्तेवर असलेल्या द्रविड पक्षांच्या वर्चस्वाला पहिल्यांदाच मोठे आव्हान मिळाले आहे. विजय स्वतः पेरंबूर आणि त्रिची (पूर्व) मतदारसंघातून आघाडीवर आहेत. TVKने १०८ जागांवर आघाडी घेतली असून पूर्ण बहुमतासाठी अजून काही जागांची आवश्यकता आहे. त्यामुळे राज्यात आघाडी सरकार किंवा बाह्य पाठिंब्याची शक्यता निर्माण झाली आहे.

केरळमध्ये मतदारांनी बदलाचा कौल देत पिनराई विजयन यांच्या नेतृत्वाखालील LDF सरकारला सत्तेबाहेर केले. काँग्रेस-नेतृत्वाखालील UDFने १४० पैकी १०२ जागांवर आघाडी घेत मजबूत पुनरागमन केले. हा विजय काँग्रेससाठी मोठा दिलासा मानला जात आहे.

आसाममध्ये मात्र BJPने सलग तिसऱ्यांदा सत्ता राखली असून पक्षाने आपली ताकद आणखी वाढवली आहे. पुडुचेरीमध्ये NDA आघाडी पुन्हा सत्तेत येण्याच्या मार्गावर आहे.

या निकालांमधून देशभरात “बदलाची लाट” स्पष्टपणे दिसून येत असून सत्ताधारी पक्षांना मतदारांनी मोठा संदेश दिल्याचे राजकीय विश्लेषकांचे मत आहे.

Leave a Reply