1
1
पुणे/अहिल्यानगर | प्रतिनिधी : Sunetra Pawar बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत प्रचंड मताधिक्याने आघाडी घेत असून मतमोजणीच्या प्रत्येक फेरीत त्यांची वाढती आघाडी स्पष्टपणे दिसून येत आहे. दरम्यान, राहुरी मतदारसंघात Akshay Kardile हेही आपल्या प्रतिस्पर्ध्यांवर आघाडीवर आहेत.बारामती पोटनिवडणूक २३ एप्रिल रोजी पार पडली होती. माजी उपमुख्यमंत्री Ajit Pawar यांच्या निधनानंतर ही जागा रिक्त झाली होती. त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार या पहिल्यांदाच निवडणुकीच्या रिंगणात उतरल्या असून मतदारांनी त्यांना मोठा पाठिंबा दिला आहे.
८व्या फेरीत प्रचंड आघाडी; 70,642 मतांची वाढ
ताज्या आकडेवारीनुसार, आठव्या फेरीअखेर सुनेत्रा पवार यांनी तब्बल 70,642 मतांची आघाडी घेतली आहे. या फेरीत एकूण 8,831 मते पडली, त्यापैकी 8,725 मते सुनेत्रा पवार यांना मिळाली, तर इतर सर्व उमेदवारांना मिळून केवळ 106 मते मिळाली.मतमोजणीच्या प्रत्येक टप्प्यात त्यांची आघाडी सातत्याने वाढत असल्यामुळे हा निकाल एकतर्फी होत असल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे. आतापर्यंत विरोधकांची एकूण मते सुमारे 1,289 इतकीच नोंदवली गेली आहेत.
विजयानंतर संयम राखण्याचे आवाहन
मतमोजणीदरम्यानच सुनेत्रा पवार यांनी कार्यकर्ते आणि समर्थकांना शांतता राखण्याचे आवाहन केले आहे. विजय साजरा करताना मिरवणुका काढू नयेत किंवा गुलाल उधळू नये, असे त्यांनी स्पष्ट केले.“मतदारांनी माझ्यावर दाखवलेला विश्वास मी आदरणीय अजित दादा यांच्या स्मृतीला समर्पित करते. हा क्षण भावनिक असला तरी आपण संयम राखूया,” असे त्यांनी नमूद केले.
राहुरीत अक्षय कर्डिले आघाडीवर
अहिल्यानगर जिल्ह्यातील राहुरी विधानसभा मतदारसंघात भाजपचे उमेदवार अक्षय कर्डिले यांनी सुमारे २१,००० मतांची आघाडी घेतली आहे. माजी आमदार शिवाजी कर्डिले यांच्या निधनामुळे ही जागा रिक्त झाली होती.
नव्या टप्प्याची सुरुवात
सुनेत्रा पवार यांनी मतदारांचे आभार मानत “ही शेवट नाही, तर नव्या बारामतीच्या दिशेने संघर्ष आणि निर्धाराची सुरुवात आहे,” असे सांगितले.