Popular Posts

राहत बाग कब्रस्तानच्या विकासाला गती; ४५ लाख रुपयांच्या निधीतून नव्या सुविधांचा शुभारंभ

राहत बाग कब्रस्तानच्या विकासाला गती; ४५ लाख रुपयांच्या निधीतून नव्या सुविधांचा शुभारंभ

राहत बाग कब्रस्तान, कौसर बाग, कोंढवा खुर्द येथे विविध प्रलंबित विकासकामांना अखेर गती मिळाली असून तब्बल ४५ लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. मागील सहा महिन्यांपासून कब्रस्तान ट्रस्टच्या पदाधिकाऱ्यांनी पुणे महानगरपालिकेकडे सातत्याने पाठपुरावा केला होता. त्यांच्या प्रयत्नांना यश मिळत निधी मंजूर झाला असून टेंडर प्रक्रिया पूर्ण होऊन वर्क ऑर्डरही जारी करण्यात आली आहे.

या निमित्ताने आयोजित उद्घाटन समारंभ स्थानिक नगरसेवक ॲड. हाजी गफूर पठाण यांच्या हस्ते संपन्न झाला.

यावेळी बोलताना नगरसेवकांनी कब्रस्तान ट्रस्टचे प्रो. शफी पठाण व नजीर मामू यांच्या कार्याचे कौतुक केले. “कब्रस्तान हे केवळ दफनभूमी नसून ते समाजाच्या श्रद्धा, परंपरा आणि अखेरच्या प्रवासाशी निगडित पवित्र स्थळ आहे. येथे आवश्यक सुविधा उपलब्ध व्हाव्यात यासाठी सर्वांनी एकत्रितपणे प्रयत्न करणे आवश्यक आहे. भविष्यातही अधिक निधी उपलब्ध करून देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत,” असे त्यांनी सांगितले.

सामाजिक कार्यकर्ते मोहम्मदिन खान यांनी मनोगत व्यक्त करताना सांगितले की, “गेल्या अनेक वर्षांपासून प्रो. शफी पठाण व नजीर मामू कब्रस्तानच्या विविध समस्यांवर सातत्याने कार्यरत आहेत. लाईट व्यवस्था, मातीची अडचण, जागेचे हस्तांतरण अशा अनेक प्रश्नांवर त्यांनी पाठपुरावा केला आहे.”

कार्यक्रमाची सुरुवात परिसरातील विविध मशिदींच्या मौलाना व मौलवी यांच्या हस्ते दुआ करून करण्यात आली. हजरत ख्वाजा गरीब नवाज मशिद, हजरत अलाउद्दीन मशिद तसेच जामा मशिद येथील धर्मगुरू यावेळी उपस्थित होते.

या कार्यक्रमास स्थानिक सामाजिक कार्यकर्ते, सोसायटी विश्वस्त, कब्रस्तानचे पदाधिकारी तसेच मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते. उपस्थितांनी भविष्यातही कब्रस्तानमध्ये स्वच्छता, सुरक्षा, पाणी, प्रकाश व्यवस्था व इतर मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी एकत्रितपणे कार्य करण्याचा संकल्प व्यक्त केला.

समारंभाच्या शेवटी नगरसेवक ॲड. हाजी गफूर पठाण यांचे आभार मानण्यात आले.