वानवडी शांती नगर चौकातील भारतरत्न संत मदर टेरेसा बोर्ड तिसऱ्यांदा गायब; पुनर्स्थापनेसाठी निवेदन

Nagrik Express 24x7 | Kondhwa Khurd, Pune | प्रतिनिधी

PUNE

Desk

2/27/20261 min read

वानवडी रामटेकडी क्षेत्रीय कार्यालयात आज सहाय्यक आयुक्त श्री. पवार यांची भेट घेऊन सामाजिक कार्यकर्ते रोहन विलास गायकवाड यांनी निवेदन सादर केले. वानवडी शांती नगर चौक (सेकरेड हार्ट सोसायटीजवळ) येथे लावण्यात आलेला Mother Teresa यांच्या नावाचा फलक तिसऱ्यांदा गायब झाल्याची बाब त्यांनी निदर्शनास आणून दिली.

निवेदनात या घटनेची गंभीर दखल घेत चौकात त्वरित नवीन फलक बसविण्याची मागणी करण्यात आली आहे.

मदर टेरेसा यांचे कार्य

मदर टेरेसा या जागतिक स्तरावर मानवसेवेचे प्रतीक मानल्या जातात. त्यांनी कोलकाता येथे मिशनरीज ऑफ चॅरिटी संस्थेची स्थापना करून गरीब, आजारी, निराधार आणि उपेक्षितांसाठी रुग्णालये, अनाथालये, वृद्धाश्रम आणि सेवा केंद्रे उभी केली. त्यांच्या मानवतावादी कार्याबद्दल भारत सरकारने त्यांना ‘भारतरत्न’ पुरस्काराने सन्मानित केले आहे.

प्रशासनाचे आश्वासन

रोहन गायकवाड यांनी संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा करून चौकात नवीन फलक तातडीने बसविण्याची मागणी केली. सहाय्यक आयुक्तांनी या प्रकरणाची दखल घेत लवकरात लवकर फलक पुनर्स्थापित करण्यात येईल, असे आश्वासन दिल्याची माहिती मिळाली आहे.

यावेळी वानवडी परिसरातील इतर प्रलंबित विकासकामांबाबतही चर्चा करण्यात आली.

स्थानिक नागरिकांमध्ये या प्रकरणाबाबत नाराजी व्यक्त होत असून, मानवतेचे प्रतीक मानल्या जाणाऱ्या व्यक्तिमत्त्वाच्या नावाचा फलक वारंवार गायब होणे ही गंभीर बाब असल्याचे मत व्यक्त केले जात आहे.